St Bus News : आजपासून एसटी महामंडळाचा तिकीट दराबाबत मोठा निर्णय
एसटीने प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 150 किलोमीटरपेक्षा अधिक अंतराच्या लांब व मध्यम प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना 15 टक्के तिकीट सवलत मिळणार आहे. ही सवलत फक्त पूर्ण भाडे भरणाऱ्या प्रवाशांनाच मिळेल. सवलत योजना 1 जुलै 2025 पासून सुरू होत आहे आणि दिवाळी व उन्हाळी सुट्ट्यांव्यतिरिक्त वर्षभर राबवली जाणार आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 1 जून रोजी एसटीच्या 77 व्या वर्धापन दिनी ही योजना जाहीर केली होती. आता ही योजना सर्व प्रकारच्या एसटी बससाठी लागू होणार आहे, मात्र सवलत केवळ आगाऊ आरक्षण करणाऱ्यांनाच मिळणार आहे.
आषाढी एकादशी व गणपतीत प्रवाशांना फायदा
पंढरपूरच्या वारीसाठी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर आणि गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना देखील आगाऊ तिकीट काढल्यास ही सवलत मिळू शकते. मात्र, या सवलतीचा लाभ जादा म्हणजेच विशेष बससेवांवर लागू होणार नाही.
ई-शिवनेरी प्रवाशांसाठी संधी
मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या इ-शिवनेरी बसमधून प्रवास करणाऱ्यांनाही ही सवलत मिळू शकते. प्रवाशांनी प्रत्यक्ष तिकीट खिडकी, अधिकृत वेबसाइट npublic.msrtcors.com, किंवा MSRTC Bus Reservation या अॅपद्वारे तिकीट बुक केल्यास 15% सवलत लागू होईल.
पूर्वी वाढलेले भाडे, आता दिलासा
अलीकडेच एसटीने 15% भाडेवाढ केली होती, त्यामुळे लांब पल्ल्याचे प्रवासी त्रस्त झाले होते. मात्र, नव्या सवलतीच्या योजनेमुळे त्यांना दिलासा मिळणार आहे. ही योजना प्रवाशांचे संख्येत वाढ करते का हे पाहावे लागेल.