IMD Weather Update: महाराष्ट्रात पुढील २४ तास धोक्याचे, ११ जिल्ह्यांना हाय अलर्ट
महाराष्ट्रात पावसाने थैमान घातलं आहे. सध्या राज्यातील अनेक भागांत जोरदार ते अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या अपडेटनुसार पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विदर्भात पावसाचे थैमान; नागपूरमध्ये शाळा बंद
विदर्भातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा जोर चांगलाच बसला आहे. नागपूर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी विपीन ईटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, परिस्थिती हाताळण्यासाठी एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या टीम सज्ज आहेत. लष्कराची मदत घेण्याचीही तयारी ठेवण्यात आली आहे. आतापर्यंत ४० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. नागपूर शहरात आज सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, असा सल्ला देण्यात आला आहे.
कोकणात हाय अलर्ट; रेड अलर्टसह समुद्रकिनाऱ्यांवर चेतावणी
कोकणात हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. रायगड, रत्नागिरी आणि मुंबईसह कोकणातील अनेक भागांत अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी समुद्रकिनारी जाणे टाळावे, असं आवाहन हवामान विभागाने केलं आहे. समुद्र खवळलेला असल्यामुळे मच्छीमारांनाही खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मध्य महाराष्ट्रात घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता
मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना हवामान विभागाकडून हाय अलर्ट देण्यात आला आहे. घाटमाथ्याच्या भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
मराठवाड्यातही पाऊस सक्रिय; वादळी वाऱ्यांचा इशारा
मराठवाड्यात आज छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
संपूर्ण राज्यात सावधगिरी बाळगण्याचे आवाहन
राज्यातील ११ जिल्ह्यांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. पुढील २४ तास हवामानाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असतील. नागरिकांनी हवामान विभागाचे आणि स्थानिक प्रशासनाचे निर्देश लक्षात घेऊन सुरक्षिततेची काळजी घ्यावी.