राज्य पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर! शासन निर्णय [GR] दिनांक:- १६ जुलै २०२५
महाराष्ट्रातील निवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. वित्त विभागामार्फत दिनांक 16 जुलै 2025 रोजी यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून, यानुसार सर्व निवृत्त सरकारी अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील निवृत्तीवेतनधारक यांना कायमस्वरूपी ओळखपत्र देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या ओळखपत्राचा उपयोग संबंधित व्यक्तींचा रेल्वे, बँका, सरकारी रुग्णालये, औषधोपचार इत्यादी ठिकाणी निवृत्त कर्मचारी व कुटुंब निवृत्तीवेतनधारक म्हणून सन्मानाने ओळख मिळावी या उद्देशाने केला जाणार आहे. विशेषतः, कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांनी केलेल्या लिखित मागणीनुसार हे ओळखपत्र देण्यात येणार असून, त्याची स्वतंत्र नोंद निवृत्तीवेतनवाहीनी प्रणालीमध्ये घेण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.
या ओळखपत्राच्या मागील बाजूस राज्य शासनाचा गोल शिक्का असणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच, खालील माहिती या ओळखपत्रावर नमूद करण्यात येईल:
- कुटुंबनिवृत्तीवेतनधारकाचे नाव
- निवृत्तीवेतन आदेश क्रमांक
- मयत निवृत्तीवेतनधारकाचे नाव
- निवृत्तीच्या वेळी धारण केलेले पद
- मयत कर्मचाऱ्याशी नाते
- ओळखपत्र क्रमांक
- जन्मदिनांक
- निवासी पत्ता
- मोबाईल क्रमांक
- रक्तगट
- विशेष आजार (जर असेल तर)
या निर्णयामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना अधिकृत ओळख मिळून विविध ठिकाणी सोयीस आणि मान सन्मान मिळण्यास मदत होणार आहे.
